औरंगाबाद:- हक्काचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे शहराचे कर्तेधर्ते म्हणविले जाणार्या नेते मंडळींचे लाडले अडचणीत आले आहेत. तशातच वॉर्ड आरक्षणाला देण्यात आलेले आव्हान वॉर्डाच्या सीमेत थोडाफार बदल होण्यापलिकडे सरकण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, नेते मंडळींची ही पोरं-सोरं आता कुणाचा बळी घेणार या विचारामुळे सुरक्षित समजल्या जाणार्या वॉर्डातील इच्छुक कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व निर्माण करणार्या शिवसेना व भाजप या पक्षातील नेते मंडळींच्या दृष्टीने सुरक्षित वॉर्डाचा शोध सुरू करण्यात आला आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आपली संबंध पणाला लावून चिरंजीवासाठी आपला जुनाच वॉर्ड सुरक्षित करून ठेवल्याचे बोलले जाते. शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याचे दोन्हीही नातलग वॉर्डाच्या आरक्षणामुळे अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी सिडको भागातील मयुर पार्क, जाधववाडी, श्रीकृष्णनगर तसेच ज्योतीनगर या वॉर्डात चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील इच्छुक कार्यकर्ते कमालीचे धास्तावले आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एक नेता यावेळी आपल्या सुनबाईलाही मनपा निवडणुकीत उतरविण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे. अर्थात सूत्राच्या या माहितीला विश्वसनीय पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही. मात्र तसेच होणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात हे मात्र निश्चित. दरम्यान, राखीव जागेतून निवडून आलेल्या एका माजी नगरसेवकाने त्याचा वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव होताच वॉर्ड हातातून जाऊ नये म्हणून अनुसूचित जमातीची सुनबाई आणण्याचा विचार सुरू केला आहे.
केवळ सीमा बदल
मनपा निवडणुकीकरिता करण्यात आलेल्या वॉर्ड रचना व आरक्षण सोडतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप पदाधिकार्यांकडून करण्यात आले. यावर तब्बल 370 आक्षेप दाखल करण्यात आले होते. या सर्व आक्षेपांची सुनावणी शनिवारी घेण्यात आली.
तर जाणून बुजून केलेल्या चुका
काही वॉर्डमध्ये नैसर्गिक हद्दी ओलांडून वॉर्ड जोडण्यात आले. कुठे ई.बी मध्ये देखील बदल करण्यात आला. रचना करताना या चुका जाणून बुजून करण्यात आल्या असल्याची चर्चा आजी- माजी पदाधिकार्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. या जाणून बुजून केलेल्या चुका मध्येच बदल केले जाण्याची शक्यता आहे.
सातारा देवळाई संबंधी ऑन द स्पॉट चर्चा
सर्वाधिक आक्षेप सातारा- देवळाई संबंधी दाखल झाले होते. रात्री नऊ वाजेनंतर यासंबंधी आलेल्या एका आक्षेपावर सुनावणी झाली. यानंतर सातारा - देवळाई येथील वॉर्ड हद्दी संबंधी मनपा अधिकारी व आयोगाच्या अधिकार्यांमध्ये ऑन द स्पॉट चर्चा झाल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यानंतर मनपाचे काही अधिकारी पुन्हा फिल्डवर उतरले आहेत. यावेळी नव्याने केलेल्या रचनेतील काही वॉर्डच्या सीमांत बदल होणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली. स्थानिक सत्तेचे केंद्र असलेल्या मनपाच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एप्रिलमध्ये या निवडणुका होतील. याकरिता प्रशासनाने 115 वॉर्डची रचना तयार केली. यानंतर आरक्षण सोडत घेण्यात आली.
पुढे यावर टीकांचा अक्षरशः पाऊस पडला. भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही झाले. यामुळे वॉर्ड रचनेवर आठ दिवसात मनपात सत्तेत असलेल्या पक्षाच्या उपमहापौर, सभागृह नेता, प्रभाग सभापती आदींसह इतर तब्बल 370 जनांनी आक्षेप नोंदविले. शनिवारी या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. यानंतर मनपातील अधिकारी दुसर्याच दिवशी फिल्डवर उतरले आहे. वॉर्ड रचना करताना काही वॉर्डांत नैसर्गिक सीमां ओलांडण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल झाल्याने यात बदल होण्याची नगरसेवकांना आशा होती. परंतु यात फार काही बदल होणार नसल्याचे स्पष्ट होत असून, काही वॉर्डांच्या सीमात केवळ बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. विशेष म्हणजे हे बदल करताना आरक्षणाला कुठलाच धक्का लागणार नाही.